Marathi Love Story
27 December 2023

प्रेम हे… (Marathi Love Story)

By shadesoflife.in

इंजिनिअरिंगला असलेली अवखळ राधा आणि वाणिज्य शाखेत शिकणारा मस्तीखोर प्रथम कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कळलेच नाही. समोरासमोर असणारी एकमेकांची घरे आणि घरच्यांचे एकमेकांशी असलेले घरोब्याचे सबंध त्यांना अजून जवळ घेऊन आले. राधाच्या घरी ती, तिचा मोठा भाऊ रोहन आणि आई बाबा तर प्रथमच्या घरी तो, त्याची मेडिकलला असणारी लहान बहीण केतकी आणि आई बाबा. राधाची आई गृहिणी आणि वडील एका नामंकित कंपनीत मोठया पदावर तर प्रथमचे वडील सधन शेतकरी आणि आई  गृहिणी. थोडक्यात दोन्ही ही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते.

राधा आणि प्रथमला झालेली प्रेमाची जाणीव घरच्यांच्या नजरेतून सुटली नाही आणि तसे ही विरोध करण्यासारखे काहीही नसल्यामुळे आणि मैत्रीचे संबंध नात्यात बदलतील असा विचार करून नोकरीला लागल्याशिवाय लग्न नाही ह्या घरच्यांच्या अटी सहित राधा आणि प्रथमच्या नात्याला मंजुरी मिळाली. राधा आणि प्रथम यांनी या गोष्टीचा मान राखून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. बघता बघता चार वर्ष निघून गेली. राधा इंजिनिअर झाली तर प्रथमने सी ए ची परीक्षा पास केली. मुळातच हुशार असलेल्या राधाला कॉलेज प्लेसमेन्ट द्वारे चांगली नोकरी मिळाली आणि प्रथमने त्याची स्वतःची सी.ए. फर्म काढायची तयारी सुरु केली.

राधा आणि प्रथमच्या लग्नासाठी असलेला नोकरीचा मोठा टप्पा दोघांनी पार केल्यानंतर दोन्ही घरांमध्ये लग्नासाठी बोलणी करण्याचे ठरले. राधाला आयुष्यभर लक्षात राहील असे गिफ्ट मिळावे म्हणून तिच्या वाढदिवसाच्या तीन दिवस अगोदरची तारीख लग्नाची काढावी असा प्रथमचा हट्ट दोन ही घरच्यांनी पुरवला. एवढ्या दिवसात कधीही विशेष कारची गरज नसल्यामुळे आणि आता घरात येणाऱ्या नवीन सुनेला त्रास नको म्हणून लग्नाच्या आधी एक महिना अगोदर असलेल्या प्रथमच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या वडिलांनी त्याला एक मोठी कार गिफ्ट केली.

त्यानंतरचा पुढचा सगळा महिना लग्नाची तयारी करण्यात, खरेदी करण्यात, मानपान आणि थीम ठरवण्यात गेले. दोघांचे कॉमन मित्र मैत्रिणी जास्त असल्यामुळे राधा आणि प्रथमच्या लग्नात जाम मज्जा करायची असे सगळ्यांचेच ठरले होते. तसेही लग्नानंतर लगेचच असलेला राधाचा वाढदिवस छान साजरा करायचा असेही त्यांचे ठरलेले असल्यामुळे त्याप्रमाणे लग्नाचे सगळे कार्यक्रम ठरवण्यात आले. दोन्ही घरातले हे पहिलेच लग्न असल्यामुळे खूप हौस करण्यात आली आणि धूमधडाक्यात  प्रथम आणि राधाचे लग्न पार पडले. प्रथम आणि राधाला तर स्वर्ग फक्त दोन बोट उरला होता. सहा वर्षांचे प्रेम आणि त्यानंतर होणारे लग्न, त्यासाठी दोघांनी ठेवलेला संयम कौतुकास्पद होता. 

मे महिन्याच्या ५ तारखेला धुमधडाक्यात राधा आणि प्रथमचे लग्न झाले आणि जाधवांची राधा आता पाटलांची सून झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचे सगळे विधी लवकर उरकून झाल्यावर दुपारीच सगळे देव दर्शनाला निघून गेले. एवढ्या वर्षांनी सगळे मनासारखे होतेय म्हणून नवीन जोडपे खूपच आनंदात होते. राधासाठी काय करू आणि काय नको असे प्रथमला झाले होते आणि त्याच उत्साहात देव दर्शनाला राधाला उचलून पायऱ्या चढणारा प्रथम जराही थकला नाही. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी राधाचा वाढदिवस असल्यामुळे तो मित्रमैत्रिणींमध्ये साजरा करायचा आणि मग चौथ्या दिवशी सकाळी पूजा आणि रात्री रिसेप्शन करायचे ठरलेले होते.

राधासाठी काय करू आणि काय नको असे प्रथमला झाले होते. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सकाळचे सगळे आवरून ही नवीन जोडी वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण द्यायला त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे गेले. दुपारी घरी आल्यावर निवांत गप्पा करत बसलेले असताना प्रथमला थोडा ऍसिडिटीचा त्रास जाणवायला लागला. तसेही लग्नामुळे जागरण आणि दगदग झाल्यामुळे त्याला त्रास होत असेल असे घरच्यांना वाटले. घरगुती उपाय करूनही बरे वाटत नाहीये उलट त्रास वाढतच चाललाय हे बघून घरच्यांची गडबड सुरु झाली. ते ज्या बिल्डिंग मध्ये राहत होते तिथे सगळ्यांच्या घरी दोन दोन कार होत्या पण नेमकी ते चालवणारे ड्राइवर उपलब्ध नव्हते. प्रथमची बहीण नुकतीच गाडी चालवायला शिकली होती आणि तशीही ती खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे उगाच काहीतरी चूक होऊ नये म्हणून तिने गाडी चालवायला नकार दिला. प्रथमचा होणार त्रास वाढायला लागला तसे घरच्यांची गडबड ही वाढायला लागली. एवढे सगळे चांगले चालले असताना मध्ये काय हे? असा प्रश्न सगळ्यांना पडला. पाटील कुटुंबाची चाललेली गडबड बघून शेजारी राहणारा आणि नुकतेच नीट गाडी चालवायला शिकलेला रोहित मदतीला आला पण माझी प्रॅक्टिस माझ्या गाडीवर जास्त असल्यामुळे मी माझ्या गाडीतून त्याला दवाखान्यात घेऊन जाईल ह्या त्याच्या म्हणण्याला सगळ्यांनी लगेचच होकार दिला.

प्रथमला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे असल्यामुळे तिच्या गाडीतून त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. पण लगेचच त्याला तिथून सिरिअस आहे हे सांगून मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला गेला. प्रथमला लवकर उपचार मिळावे म्हणून त्याला त्याच गाडीतून मोठ्या दवाखान्यात नेत असतानाच त्याला मेजर हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला आणि होत्याचे नव्हते झाले. रिसेप्शन होईपर्यंत दारावरचा मांडव आणि बिल्डिंगचे लाईट काढायचे नाही हा प्रथमचा हट्ट होता म्हणून ते ही तसेच होते आणि आता त्याच मांडवात त्याचा मृतदेह आणण्यात आला. जेवढी त्यांच्या लग्नात गर्दी नव्हती तेवढी ही बातमी एकूण त्याच्या घरी येणाऱ्यांची संख्या वाढली होती. कोणालाही घडलेल्या घटनेवर विश्वास बसत नव्हता. राधाला तिच्या वाढदिवसाला काहीतरी खास गिफ्ट द्यावे म्हणून धडपडणारा प्रथम आता ह्या जगातच राहिला नव्हता. राधाचा नुकत्याच घडलेल्या घटनेवर विश्वासच बसेना. सगळ्यांची मनस्थिती अतिशय वाईट होती. ह्या सगळ्यात कोणाचे दुःख मोठे हे ठरवणेच अवघड झाले होते.

पाटील कुटुंबियांना माहिती होते जे घडले त्यामध्ये राधाचा काहीही दोष नाही म्हणून त्यांनी तिला त्यांच्या घरी राहायचा आग्रह केला पण प्रथमच्या मृत्यूनंतर राधा कायमची माहेरीच निघून गेली. ती धड माहेरचीही नाही आणि धड सासरचीही नाही अशी तिची परिस्थिती झाली होती. आपला समाज कितीही पुढारलेला आणि सुशिक्षित असला तरीही तिच्याबद्दल आजूबाजूला काहीही बोलले जायचे. इकडे राहून तिला प्रथमची आठवण तशीही खूपच त्रास द्यायची आणि म्हणूनच अमेरिकेतून आलेली नोकरीची संधी स्वीकारायची तिने ठरवले. दर तीन वर्षातून ती भारतात यायची आणि आली की प्रथमच्या घरच्यांनाही भेटूनच ती परत जायची. मधल्या काळात तिच्या भावाचे रोहनचेही लग्न झाले आणि प्रथमच्या बहिणीचे म्हणजेच केतकीचे ही लग्न झाले. दोन्हीही लग्नांमध्ये राधा आवर्जून उपस्थित होती तिच्या शरीराने पण मनाने नाही.

जाधव आणि पाटील कुटुंबियांना राधाची खूपच काळजी होती आणि म्हणूनच तिने परत लग्नाचा विचार करावा असे दोन्हीही घरच्यांना वाटत होते पण प्रथमच्या आठवणीत मी माझे उर्वरित आयुष्य छान घालवेल हे सांगून तिने परत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या पुढच्या तीन वर्षांनी ती परत भारतात सगळ्यांना भेटायला आली आणि त्याचवेळी साध्याश्या आजाराचे निमित्त होऊन तिनेही ह्या जगाचा निरोप घेतला.

ह्या पृथ्वीवर असलेली त्यांची ही प्रेमकहाणी अश्याप्रकारे संपली आणि प्रेम हे असेही असते ही प्रेमाची नवीन व्याख्या कळली.

(Real life Marathi Love Story)