लक्ष्मीच्या पावलांनी पाटलांच्या घरात स्वतः बरोबर खूप सारे ऐश्वर्य घेऊन आलेली रेवती घरात अतिशय लाडकी होती. पाटलांच्या कुटुंबातील पहिलेच अपत्य असल्यामुळे तिच्या आजीने प्रेमाने तिचे नाव रेवती ठेवले. रेवती जन्मला यायच्या अगोदर पाटलांच्या घरची परिस्थिती बेताची होती म्हणजेच खाऊन पिऊन सुखी असे पाटील कुटुंबीय होते. पाटील कुटूंबात प्रकाश, त्याला साजेशी अशी त्याची बायको मीरा, आई आणि वडील असे कुटुंब होते. प्रकाशला दोन लग्न झालेल्या बहिणी पण होत्या आणि त्या त्याच शहरात असल्यामुळे त्यांचे प्रकाशच्या घरी सतत येणे जाणे होते. प्रकाश अतिशय मेहनती होता. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या प्रकाशला सतत काहीतरी नवीन शोधायचा छंद होता आणि हीच आवड त्याला पुढे घेऊन गेली. प्रकाशने शोधलेले एक मशीन शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरल्याने लवकरच प्रकाश प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने नवीन मशीनचा शोध लावायला आणि रेवतीचा जन्म साधारण एकाच वेळचा असल्यामुळे तिच्या पावलांनी लक्ष्मी घरात आली असा सगळ्यांचा समज झाला. तसेही घरातील पहिले अपत्य असल्यामुळे घरात लाडकी असलेली रेवती सगळ्यांच्या लाडामुळे खूप हट्टी झाली. जे मागेल ते तिला मिळत गेले. तिच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी रितेशचा जन्म झाला. पण घरात लहान असला तरी रितेश शांत आणि समजूतदार होता. प्रकाश आणि मीराच्या संस्कारात वाढलेली दोन्हीही मुले अतिशय छान होती. रेवती पण दिसायला रूपवान होती. सगळे अतिशय छान चालले होते. प्रकाशच्या नवीन शोधामुळे घरात पैसे यायला लागले आणि लवकरच लहान घरातून पाटील कुटुंब मोठ्या डुप्लेक्स घरात रहायला गेले. जसा पैसा येत गेला तसा पाटील कुटुंबियांच्या राहणीमानात फरक पडत गेला. घरात रेवतीचा हट्टीपणा सोडता त्यांच्या वागण्यात कुठेही गर्व नव्हता. मॉडर्न राहणीमान असलेल्या रेवतीला फॅशन डिझाईनची आवड असल्याने तिने त्यातूनच पदवी घेतली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला छानसे बुटीक टाकून दिले.
मधल्या काळात ती एका डान्स क्लास चालवणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या निशांतच्या प्रेमात पडली. निशांत दिसायला छान होता. आई वडिलांचा एकुलता एक असलेल्या निशांतच्या घरची परिस्थिती म्हणजे खाऊन पिऊन सुखी. त्याचे कुटुंब म्हणजे तो आणि त्याचे आई-वडील. निशांतचे आई आणि वडील दोघेही नोकरी करत होते. निशांत अतिशय समजूतदार होता. निशांतलाही रेवती खूप आवडत होती पण दोघांच्या घरची परिस्थिती वेगळी असल्यामुळे निशांत मनात असूनही रेवतीला प्रेमाची कबुली द्यायला घाबरत होता. शेवटी रेवतीने पुढाकार घेऊन निशांतला प्रपोज केले आणि निशांत-रेवती ची प्रेमकहाणी सुरु झाली.
रेवतीच्या प्रेमाची कुणकुण पाटलांच्या घरी लागल्यावर घरातल्या सगळ्यांनीच खूप विरोध केला. त्याला कारण ही तसेच होते आणि ते म्हणजे दोंघांच्याही घरची परिथिती अतिशय वेगळी होती. सधन असलेल्या पाटलांच्या घरात स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बायका होत्या. त्यामुळे रेवतीला कोणतेही काम येत नव्हते. घरात अतिशय लाडकी असल्यामुळे ती तसेही कोणतेही काम करत नव्हती. कधी तिने स्वतः साठी कॉफी जरी केली तरी तिचे कौतुक व्हायचे. ती जे मागेल ते तिला लगेच मिळायचे. असे असताना लग्न झाल्यावर तिचे कसे होईल? हा विचार करून घरातील सगळे रेवतीच्या लग्नाला विरोध करत होते. मुळातच हट्टी असलेली रेवती घरच्यांच्या विरोधामुळे अजून हट्टाला पेटली आणि लग्न केले तर निशांत बरोबर नाहीतर नाही असे तिने डिक्लेअर केले. निशांतचे आई वडील अतिशय साधे होते त्यामुळे एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी आपल्याला डोईजड होईल असा विचार करूनही त्यांनी निशांतच्या इच्छेखातर लग्नाला परवानगी दिली. त्यांनाही खरेतर ह्या सगळ्या गोष्टींचे दडपण आले होते. सहा महिने होऊनही रेवती ऐकत नाही म्हंटल्यावर रेवतीच्या हट्टाखातर शेवटी पाटील कुटुंब रेवती आणि निशांतच्या लग्नासाठी तयार झाले.
आपल्या लाडक्या लेकीला लग्नानंतर काही त्रास नको म्हणून निशांतच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर विक्रीस काढलेला एक फ्लॅट चांगलीच किंमत देऊन पाटलांनी विकत घेतला. रेवतीच्या मनाप्रमाणे नवीन फ्लॅट आणि निशांत राहत असलेल्या संपूर्ण घराचे त्यांनी छान असे इंटेरिअर करून दिले. ह्या सगळ्यांमध्ये निशांतच्या घरच्यांचा स्वाभिमान कुठेही दुखावला जाणार नाही ह्याचीही त्यांनी काळजी घेतली. आपल्या लाडक्या मुलीला काहीही कमी पडू नये असे पाटील कुटुंबाला मनापासून वाटत होते. लग्नात सगळ्या विधी पूर्ण साग्रसंगीत करायच्या ह्या रेवतीच्या इच्छेखातर लग्नाचे सगळे विधी पाच दिवस चालले होते. तिची सगळी हौस पाटील कुटुंबांनी पूर्ण केली आणि थाटामाटात रेवती आणि निशांतचे लग्न करून दिले. अगोदरच सुंदर असलेली रेवती सोन्याने मढल्यामुळे खरोखरच लक्ष्मीचे रूप दिसत होती.
एवढी मॉडर्न असलेली रेवती लग्नानंतर जास्त दिवस सासरी राहणार नाही असे सगळ्यांनाच वाटत होते कारण ती थोडी चंचल पण होतीच. सगळ्यांना वाटायचे की लग्न झाल्यावर पण रेवती कायम माहेरी दिसेल. पण लग्नाला साधारण वर्ष झाला तरीही ती कोणालाही दिसली नाही. तिचे छान चालले असावे कदाचित. साधारण वर्षभरात रेवती तिच्या सासरी एवढी छान रुळली कि तिचे माहेरी येणेही जवळपास कमी झाले. तिचे सासू सासरे पण अतिशय साधे असल्यामुळे त्यांनी ही तिला कधी कशातच आडवले नाही. अगोदर अतिशय हट्टी असलेली रेवती निशांतवर असलेल्या अतिशय प्रेमामुळे खूप समजूतदार झाली. तसेही बुटीक मध्ये तिचा स्टाफ असल्यामुळे हे पूर्ण वर्ष तिने घरातच काढले. घर ही तिने पहिली प्रायोरिटी ठेवली, सासू सासर्यांचे मन जिकंले. सासू नोकरीवरून यायच्या अगोदर स्वयंपाक तयार करणे, त्यांना गरम चहा हातात नेऊन देणे, दिवाबत्ती करणे, सगळे घर स्वच्छ ठेवणे हे ती अगदी मनापासून आणि स्वतःहून करत होती. प्रेमात केवढी ताकत असते हे त्यामुळे नव्याने कळले. अगदी टिपिकल सून म्हणून वागायला लागलेली रेवती एवढी बदलली की विश्वास ठेवणे अवघड जाईल.
रेवतीचे आपुलकीचे वागणे, घर एवढे छान ठेवणे, सगळ्यांची काळजी घेणे, नातेवाईक जपणे त्यामुळे वर्ष भरातच मला कळले की, तू घर छान सांभाळू शकतेस म्हणून आता मी घर सांभाळेल आणि तू तुझ्या करिअर वर लक्ष दे, असे सांगून तिच्या सासूने स्वतःहून नोकरी सोडली. त्या मीराला म्हणतात ना, की मी कधी घरी पुरणपोळी केली नाही आणि रेवती आता एकटी वीस माणसांचा पुरणाचा स्वयंपाक करते. ह्या गोष्टीचे त्यांना खूप कौतुक वाटते. रेवती घरात येण्यापूर्वी तिच्याबद्दल जे त्यांचे मत होते ते पूर्णपणे बदलले. निशांतच्या हृदयाची तर ती राणी आहेच पण आता सगळ्या घराची लाडकी झालीए. तिने तिच्या फॅशन शी संबंधित एक ऍडव्हान्स ब्युटी कोर्स केला आणि ती आता लग्नाचे पूर्ण पॅकेज घेते. प्रेम माणसाला एवढे बदलते हे रेवती कडून शिकायला मिळाले. तिची सासू आता मीराला फोन करून सांगतात की आम्हाला रेवती सारखी सून मिळाली आम्ही खूप नशीबवान आहोत आणि निशांतचे तर काही बोलायलाच नको… (Marathi Love Story)