(This Marathi love story is inspired by true events.)
असे म्हणतात की लग्न जसे जुने होत जाते तसे ते जास्त मुरत जाते. साथीदारांमध्ये एकमेकांना जशी समजून घेण्याची वृत्ती वाढते तसेच त्यांचे प्रेम ही वाढत जाते. आजची कथा आहे सगळ्यांचे लाडके असलेले भाऊ यांच्याबद्दल. ज्यांनी वयाची सत्तरी नुकतीच पूर्ण केलेली आहे. खरेतर त्यांचे नाव विजय जोशी पण ते स्वभावाने अतिशय प्रेमळ असल्यामुळे सगळेच त्यांना प्रेमाने भाऊ म्हणायचे. रमा आणि भाऊंच्या लग्नाला आता जवळपास चाळीस वर्ष होऊन गेलेली होती आणि दोघेही समजूतदार असल्यामुळे त्यांचा संसार अतिशय सुखाचा चालला होता. त्यांचे कुटुंब म्हणजे बायको रमा, मुलगा वसंत, सून आनंदी, दोन नाती त्यांना राधा, देवी आणि त्यांचा लहान भाऊ म्हणजे रवींद्र. भाऊंचा मुलगा म्हणजेच वसंत एकुलता एक असल्यामुळे थोडासा हट्टी होता आणि स्वभावाने जरा चिडखोर होता, त्याला एखाद्या गोष्टीचा पटकन राग यायचा आणि वसंतच्या ह्याच स्वभावामुळे भाऊंचा त्यांच्या मुलापेक्षा सुनेमध्ये आणि नातींमध्ये अतिशय जीव होता. जोशी कुटुंबात भाऊ प्रेमळ, वसंत चिडखोर तर दादा हे अतिशय प्रक्टिकल स्वभावाचे, रमा ह्या शांत तर आनंदी ही मनमोकळ्या स्वभावाची आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी होती. घरात सगळ्यांचे स्वभाव जरी वेगवेगळे असले तरीही सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे काम भाऊंची बायको रमा आणि आनंदी मस्त करायचे. एकंदर सगळे मस्तच चालले होते.
विजय जोशींचे कुटुंब म्हणजे उच्च मध्यमवर्गीय असणारे. त्यांना वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी आणि स्वतः ते सरकारी नोकरीत वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती. भाऊ सरकारी नोकरीतून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले तर दादा हे सरकारी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर होते. सून आनंदी आणि मुलगा वसंत दोघेही इंजिनिअर आणि नोकरी करणारे तर सीता ह्या गृहिणी असल्यामुळे घर अतिशय उत्तम सांभाळायच्या. सीता ह्यांना घरात जास्त काम नको पडायला म्हणून आनंदीने घरातील सगळ्याच कामांना बायका ठेवल्या होत्या. खरेतर भाऊंचा स्वभाव अतिशय मवाळ. सगळ्यांशी प्रेमाने बोलणार, अतिशय भोळे आणि त्याचमुळे त्याच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ नये असे दादांना सतत वाटायचे. त्यांना या गोष्टीची अतिशय भीती वाटायची त्यामुळे घरच्यांच्या दबावामुळे जरी दादांनी पहिले लग्न केले असले तरीही लग्नानंतर वर्षभरातच त्यांची बायको त्यांना सोडून गेल्यानंतर भाऊंच्या काळजीपोटी त्यांनी परत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. निवृत्त असल्यामुळे आणि वेळ जावा म्हणून घरातील सगळी बाहेरची कामे भाऊ स्वतः आनंदाने करायचे. त्यांना गाडी चालवायची विशेष आवड नव्हती त्यामुळे ते सतत हातात एक कापडी पिशवी घेऊन कॉलनीमध्ये फिरताना दिसायचे. त्यामुळे ते कॉलनीमध्ये सगळ्यांच्या ओळखीचे झालेले होते.
एका मोठ्या सोसायटीमध्ये त्यांचा प्रशस्थ फ्लॅट सातव्या मजल्यावर असूनही प्रत्येकवेळी घरातून जो कोणी बाहेर पडेल त्याला सोडवायला ते खाली पार्किंग मध्ये यायचे. दिवसातून कमीतकमी त्यांच्या वीस ते तीस चक्कर व्हायच्या आणि हे सगळे ते अतिशय आनंदाने करायचे. येता जाता सगळ्यांशी मस्त बोलायचे. त्यामुळे तसे ते सगळ्यांच्याच ओळखीचे. एखाद्या दिवशी ते दिसले नाही तर सगळ्यांना चुकचुकल्यासारखे वाटायचे. भाऊंचे त्यांच्या सुनेबरोबरचे बॉण्डिंग अगदी मस्त होते. सगळ्यांना असे वाटायचे की ती त्यांची सून नसून मुलगीच आहे. एकदा भाऊ बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांचा हात फॅक्चर झाला तर त्यांना वेळेवर दवाखान्यात नेण्यापासून ते हात बरा होईपर्यंत सगळी काळजी आनंदीने अतिशय उत्तम घेतली ह्या सगळ्यांमध्ये वसंत होताच तिच्याबरोबर. थोडक्यात सगळे नजर लागावे एवढे छान चालले होते.
कदाचित वयामुळेही असेल आजकाल भाऊंना झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो हे घरच्यांच्या लक्षात आले आणि त्याचमुळे झोपेत भाऊंना काही झाले तर कळणारही नाही म्हणून भाऊंची इच्छा नसताना त्यांना घरचे दवाखान्यात घेऊन गेले. लगेचच भाऊंचे सगळे रिपोर्ट करण्यात आले आणि त्यानंतर कळले की भाऊंना हार्ट मध्ये काही ब्लॉकेज आहेत त्यामुळे झोपेत त्यांचा श्वास थांबतो आणि त्यांची बायपास केली तर हा त्रास थांबू शकतो. डॉक्टरांनी असेही सांगितले होते की भाऊंचे वय बघता ऑपरेशन करणे थोडेसे रिस्की असू शकते. पण झोपेत भाऊंना काय झाले तर कळणारही नाही म्हणून घरातल्या सगळ्यांनी ठरवले की भाऊंचे ऑपरेशन करायचे. कारण झोपेत जर त्यांचा श्वास अचानक थांबला तर काही अघटित व्हायला नको म्हणून भाऊंना त्यांनी शहरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये लगेचच ऍडमिट करून भाऊंचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. लवकरच भाऊंचे ऑपरेशन झाले आणि ते व्यवस्थित पार पडलेही. सुरवातीचे काही दिवस भाऊंना दवाखान्यात देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि थोड्याच दिवसात भाऊंना बरे वाटल्यामुळे त्यांना घरी घेऊन जायला डॉक्टरांनी परवानगी दिली.
भाऊ एवढ्या दिवसांनी सुखरूप घरी आल्यामुळे सगळे खूपच खुश होते ज्या दिवशी सकाळी भाऊंना घरी आणण्यात आले त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्याशी गप्पा करत असताना त्यांना खोकल्याची जोऱ्यात उबळ आली. खूप वेळ खोकल्यामुळे आणि त्यांचे टाकेही ओले असल्यामुळे त्यांना ऑपरेशन केलेल्या ठिकाणी रक्स्त्राव सुरु झाला. घरचे सगळे घाबरले आणि त्यांनी लगेचच डॉक्टरांना फोन करून भाऊंची सद्यस्तिथी सांगितली. डॉक्टरांनी भाऊंना ताबडतोब परत दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवस दवाखान्यात असूनही भाऊंच्या तब्बेतीत म्हणावी अशी सुधारणा झाली नाही. सून आनंदी आणि मुलगा वसंत त्यावेळी सतत त्यांच्याबरोबर होते. घरातल्या सगळ्यांना असेच वाटायला लागले की आपण उगाच आपण भाऊंच्या ऑपेरेशनची घाई केली आणि म्हणूनच रमाला भाऊंची तब्बेत बघून कोणताही त्रास व्हायला नको म्हणून कधीतरीच आनंदी त्यांना दवाखान्यात घेऊन जायची.
आनंदीला असे वाटायचे की भाऊंची एवढी खलावलेली तब्बेत बघून रमाला टेन्शन येऊन काही व्हायला नको आणि म्हणूनच ती रमाची खूप काळजी घ्यायची. आता भाऊंना दवाखान्यात ठेऊन जवळपास पंचवीस दिवस झाले पण तरीही त्यांच्या तब्बेतीत म्हणावी अशी सुधारणा झाली नाही उलट तब्बेत जास्तच बिघडत गेली. मध्यंतरी चार पाच दिवस झाले तरीही दवाखान्यात न्यायला आनंदी नाही म्हणत होती आणि तरीही हट्टीपणा करत शेवटी भाऊंना बघायला रमा दवाखान्यात गेली. त्यांना मनसोक्त भेटून घरी आली आणि त्याच रात्री भाऊंनी ह्या जगाचा निरोप घेतला जणू काही ते पण रमा ला शेवटचे भेटावे म्हणून वाट पाहत होते. रात्री जसे आनंदीला डॉक्टरांनी सांगितले तशी ती घरी सांगायला आली पण घरी जाण्यापूर्वी हिम्मत गोळा करण्यासाठी पार्किंमध्ये बसून मनसोक्त रडली कारण तिलाही माहित होते की आता घरात सगळ्यांना सांभाळायचे काम तिलाच पार पडायचे आहे.
रमाला शेवटचे भेटता यावे म्हणून एवढे सिरियस असूनही वाट बघणारे भाऊ आणि हट्टाने त्यांना भेटायला जाणारी रमा ह्यांचे प्रेम हे समजण्यापलीकडे होते. तसेच भाऊंवर वडिलांपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आनंदीचे त्यांच्यावर असणारे प्रेम खरोखऱच जगावेगळे होते. तसेच भाऊंसाठी परत लग्न न करण्याचा निर्णय घेणारे दादा ह्यांच्याबद्दल तर काय बोलायचे. अश्या गोष्टी जेंव्हा अवती भोवती घडतात तेंव्हा कळते प्रेम हे असेही असते.
(Marathi Love Story)