Marathi Story
25 February 2024

बंध नात्याचे (Marathi Story)

By shadesoflife.in
(This Marathi story is inspired by true events.) 

बहिणीची अतिशय आवड असलेल्या स्वानंदला दोनही लहान भाऊच होते. त्याची बहिणीची एक विशिष्ट कल्पना होती आणि म्हणूनच त्याचे त्याच्या चुलत आणि मावस बहिणी बरोबर विशेष असे ट्युनिंग जमलेच नाही. तो जिथे जाईल तिथे माझी बहीण असती तर ती अशी असती अशी कल्पना करत असे. स्वानंदचे बहिणीचे प्रेम एवढे होते की लवकरच त्याला त्याच्या कल्पनेतील बहीण भेटली.

मास्टर्स करायला तो जवळच्याच शहरात गेला आणि जेंव्हा त्याने विभाला पहिल्यांदा बघितले त्याला खूपच आनंद झाला. विभा पण शिकण्यासाठी जवळच्याच गावातून आली होती. गावाकडे राहिल्यामुळे थोडीशी घाबरलेली आणि बावरलेली विभा स्वानंदच्या बहिणीच्या कल्पनेत एकदम फिट बसली. त्याने तिच्याशी अगोदर मैत्री केली, त्याचे नशीब एवढे चांगले कि त्याच्या फ्लॅटच्या जवळच विभा पण तिच्या मैत्रीणीं बरोबर राहत होती. त्यामुळे तो नेहमीच तिच्याबरोबर कॉलेजला जायचा. हळू हळू विभा आणि स्वानंद चे ट्युनिंग मस्त जमत गेले आणि विभाच्या रूपाने आपल्याला हवी तशी बहीण मिळाली म्हणून स्वानंद खूपच आनंदात होता. विभाला दोन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण होती. पण स्वानंदचे बहिणी विषयी प्रेम बघता ती ने पण त्याला आपला भाऊ मानला. तशी कल्पना तिने तिच्या घरी अगोदरच देऊन ठेवली होती. त्याला कारण ही तसेच होते कारण तिच्या गावातून नेहमीच कोणी ना कोणी त्या शहरात खरेदीसाठी यायचे त्यामुळे कोणाचा गैरसमज नको व्हायला आणि आपल्या आणि स्वानंद विषयी कोणी उलट सुलट घरी नको सांगायला असे तिला वाटत होते.

विभाच्या तोंडून स्वानंद विषयी कौतुक एकूण स्वानंद खरोखरच चांगला मुलगा आहे कि नाही हे बघायला एकदा तिचा मोठा भाऊ येउन गेला. विभाने स्वानंद ला फक्त मोठा भाऊ येतोय हे सांगितले पण कशासाठी ते नाही सांगितलं.स्वानंदने लगेच तिला सांगितले की मला पण तुझ्या दादाला भेटायचे आहे. स्वानंद ला जेंव्हा विभाचा दादा भेटला तेंव्हा तो खूप खुश झाला आणि तू असताना आम्हाला विभाची काळजी नाही असे सांगितले आणि विभाची जबाबदारी स्वानंद वर टाकल्यामुळे स्वानंद तर खूपच खुश झाला. थोडक्यात सगळे स्वानंदच्या मनातं असल्यासारखे घडत होते. मास्टर्स च्या ह्या दोन वर्षात स्वानंदची रक्षाबंधन आणि भाऊबीज मस्त साजरी झाली. तो जेंव्हा त्याच्या घरी भेटायला जायचा तेंव्हा तो सतत विभाविषयी बोलायचं त्यामुळे ती त्याचा घरात परिचित होती. बघता बघता दोघांचेही मास्टर्स पूर्ण झाले विभा तिच्या गावी गेली तर स्वानंद नोकरीसाठी वेगळ्या गावी गेला.

मध्ये मध्ये दोघेही एकमेकांशी बोलायचे. स्वानंदचे वडील सतत आजारी असल्यामुळे नोकरीला लागताच त्याचे लग्न लवकर करावे असे सगळ्यांना वाटत होते आणि त्याचमुळे नोकरीला लागून वर्ष होताच त्याचे लग्न ठरवले. सगळ्यात अगोदर ही बातमी त्याने विभालाच दिली. तिला पण खूप आनंद झाला. माझ्या लग्नात तू मला हवीच आहे हे सांगून त्याने रीतसर विभाच्या घरी आमंत्रण दिले. पण त्याच्या लग्नात सगळ्यांना जाणे शक्य नसल्याने फक्त विभा येईल हे त्यांनी त्याला सांगितले. विभा येतेय म्हणून स्वानंद तर खूपच आनंदात होता.

लग्नाच्या दोन दिवस आधी विभा स्वानंदच्या घरी गेली. तिथे गेल्यावर तिला अजिबात असे वाटले नाही की आपण पहिल्यांदा ह्या लोकांना भेटतोय. स्वानंदने तिच्याविषयी एवढे घरी सांगून ठेवले होते. त्याचे दोन ही भाऊ तीला ताई म्हणून तिच्या मागे मागे फिरत होते तर त्याची आई आणि बाबा पण तिला बघून खूप खुश झाले. ती ज्यादिवशी स्वानंदच्या घरी पोहचली त्यादिवशीचा मुलीकडचे पण तिथे आले. आल्या आल्या नवरीने मला विभाताईला भेटायचे आहे असा निरोप स्वानंद च्या घरी पाठवला. जेंव्हा राधा म्हणजे स्वानंद च्या  होणाऱ्या बायकोने विभाला बघितले ती खूप खुश झाली. स्वानंद आणि राधाचे धूम धडाक्यात लग्न झाले आणि विभा परत आपल्या घरी आली.

नेहमी विभा आणि स्वानंद चे फोन व्हायचे आता राधा पण विभाला आठवणीने फोन करायची. लवकरच विभाचेही लग्न मुंबईमध्ये राहणाऱ्या आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राघव बरोबर ठरले. विभाने ही काहीही झाले तरी तू आणि राधा माझ्या लग्नात मला हवे आहात असा प्रेमळ हट्ट स्वानंदकडे केला. स्वानंद आणि राधाचे पण आगोदर पासून ठरलेले होतेच की विभाच्या लग्नात खूप धमाल करायची. आता मध्ये अधे राघव पण विभाला फोन करायचा. नोकरीनिमित्त स्वानंदची सतत बदली व्हायची आणि लवकरच त्याची बदली राघवच्या शहरात म्हणजेच मुंबईला झाली त्यामुळे विभा खूप खुश होती. लग्नानंतर पण एक भाऊ तिच्या जवळ असणार होता म्हणून.

विभाला बघता क्षणी राघव तिच्या प्रेमातच पडला पडला.अगोदर तो त्याला जसा वेळ मिळेल तेंव्हा लगेच तिला फोन करायचा पण नंतर तो दरोरोज तिला फोन करायला लागला. तिने फोन उचलायला जरा जरी वेळ लावला तरी तो कासावीस व्हायचा. राघवला तर असे झाले होते की कधी एकदा लग्न होते आणि विभा कायमची त्याच्या घरी येते. तो तिच्या बाबतीत अतिशय पझेसिव्ह झाला होता आणि त्याच्या ह्याच स्वभावामुळे राघवला जेंव्हा प्रत्यक्ष भेटू तेंव्हा स्वानंद विषयी बोलू असे विभाला वाटल्यामुळे तिने राघवला स्वानंद विषयी काहीच सांगितले नाही.

नुकतीच स्वानंदची बदली मुंबईला झाली आणि त्याचमुळे लँडलाईन वरून मुंबईचा नंबर बघून तिला वाटले की तिला स्वानंदचाच फोन आला आणि उत्साहात ती बोलायला लागली आणि नेमकी तो कॉल राघवचा होता. झालं  राघव चा सगळा मूड तर गेलाच पण ह्याच कारणामुळे तो खूप दिवस विभावर नाराज पण होता. आपल्या लग्नात जेंव्हा  स्वानंद आणि राघवची भेट होईल तेंव्हा राघवच्या मनातील  स्वानंद विषयी असलेला राग निघून जाईल असे विभाला वाटले. पण झाले उलटेच नेमकी त्याचवेळी त्याला पुन्हा अचानक बदलीची ऑर्डर मिळाली आणि नेमकी विभाच्या लग्नाच्या दिवशीच त्याचे नवीन ठिकाणी जॉयनीग असल्यामुळे आणि राधाला पण आठवा महिना पूर्ण होत असल्यामुळे तो आणि राधा मनात खूप असूनही विभाच्या लग्नाला येऊ शकले नाही. त्यामुळे विभा पण स्वानंद वर नाराज झाली.

स्वानंद आणि राधा ला पहिला मुलगा झाला त्यावेळी स्वानंद जरा नाराजच झाला कारण त्याला मुलगी हवी होती आणि म्हणूनच पहिला मुलगा चार वर्षाचा होताच त्याने परत मुलीसाठी चान्स घ्यायचे ठरवले पण दुसऱ्या वेळेस ही त्याच्या पदरी निराशाच पडली. तो जसा त्याला बहीण पाहिजे होती म्हणून तळमळत होता तशी त्याच्या मुलांची परिस्थिती नको व्हायला असे त्याला वाटायचे. त्यातच आजकाल राधाची तब्बेत ही नीट नसायची त्यामुळे खूप मनात असूनही तो गप्प बसला.

आजकाल तर राधाचे फोन विभाला येईनासे झाले होते. विभा पण स्वानंद आणि राधाला खूप मिस करायची पण बोलणार कोणाला अशी तिची परिस्थिती होती. आता जवळपास ह्या घटनेला दहा वर्ष उलटून गेली होती. विभा आणि स्वानंदचा कॉन्टॅक्ट जवळपास तुटलाच होता. राधाचे पण फोन येत नव्हते. लवकरच एका कार्यक्रमामध्ये तिला तिच्या कॉलेज मधली एक मैत्रीण भेटली आणि तिच्याकडून कळले कि राधा ला कसला तरी आजार झाला होता आणि त्यातच ती तीन वर्षांपूर्वी गेली. विभाला अतिशय वाईट वाटले. तिला राधाचे फोन का येत नाही ह्याचे कारणही कळले आणि खूप अपराधी पण वाटले. तिने परत एकदा राघव ला सांगण्याचा प्रयत्न केला आणि  स्वानंदला भेटायचे आहे हे ही सांगितले पण ह्याही वेळेस राघवने तिला स्वानंदला भेटायला मनाई केली. बिचारी विभा मनातल्या मनात कुढत राहिली.

दुसरा मुलगा नऊ महिन्याचा असतानाच राधाची तब्बेत जास्तच बिघडली आणि ती हे जग सोडून गेली. दोनही मुले लहान होती आणि त्यांचे करायला ही कोणी नव्हते म्हणून राधा गेल्यानंतर काही महीन्यातच घरच्यांनी  स्वानंदचे लग्न सीमा बरोबर करून दिले. आगोदरच वाईट मनस्थितीत असलेला स्वानंद ह्या लग्नाने खुश नव्हता पण मुलांसाठी तो तयार झाला. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विभा त्याला बरोबर हवी होती पण विभा तिच्या वेगळ्याच मनस्थितीत होती.

जसा काळ पुढे सरकत गेला तसे  स्वानंदने सीमाला स्वीकारले. अगोदरच प्रेमळ आणि शांत असलेली सीमा मुलांसाठी जरी घरात आली असली तरी तिचे मुलांबरोबरचे वागणे बघून स्वानंदही तिच्याबरोबर नीट वागायला लागला. स्वानंदचे बहिणीप्रती असलेली ओढ सीमाला त्याच्या घरच्यांकडून कळली आणि म्हणूनच आपल्याला एक मुलगी हवी म्हणून ती स्वानंद च्या मागे लागली. आजकाल च्या जमान्यात एक मूल बस असताना अगोदरच त्याला दोन मुले होती पण मुलीची ओढ तर स्वानंदला पण होतीच आणि त्याचमुळे त्याने पण सीमाचे मन राखून तिसरा चान्स घेतला आणि ह्यावेळी जणू देवाने त्याचे ऐकले आणि त्याला एक गोंडस मुलगी झाली.

सीमाला स्वानंदचे राधावर किती प्रेम होते हे माहित होतेच आणि त्याच प्रेमाचा आदर करून सीमानेच हट्टाने मुलीचे नाव स्वानंद आणि राधाच्या नावामधले एक एक अक्षर उचलून स्वरा ठेऊन स्वानंदचे मन जिंकले. आपल्या मुलांना आता रक्षाबंधन आणि भाऊबीजेला हक्काने ओवाळणारी बहीण आली म्हणूनच स्वानंद जेवढा खुश होता त्याच्या कित्येक पटीत त्याची दोनही मुले आणि बायको होती…

(Marathi Story)