Prema Tuza Rang Kasa - Marathi Love Story - Nivesh & Reva
14 April 2024

प्रेमा तुझा रंग कसा (Marathi Love Story)

By shadesoflife.in

(This Marathi Love Story is inspired by true events.) 

पुण्यातल्या एका नामांकित कॉलेज मध्ये शिकणारे रेवा आणि निखिल जेंव्हा पहिल्यांदा भेटले तेंव्हा एकमेकांच्या प्रेमातच पडले. नाजूक अशी असणारी आणि दिसायला रेखीव असलेली रेवा कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावे अशीच होती. कॉलेजच्या एका एकांकिका स्पर्धेच्या वेळी दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. रेवा सायन्स मधून शिकत होती तर निखिलला अकॉउंटस मध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे तो कॉमर्स मधून शिकत होता. कॉलेजचे सोनेरी दिवस पटकन उडून गेले. रेवा तशी अभ्यासात बरी होती पण डॉक्टर लाईनला जाण्याइतके मार्क न मिळाल्यामुळे तिने पुढे एम. एसी. करायचे ठरवले तर निखिल अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याने बँकेच्या परीक्षा द्यायचे ठरवले. ग्रॅज्युएशन पर्यंत दोघांनाही एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळायचा त्यामुळे त्यांच्या सतत भेटीगाठी व्हायच्या. पण कालांतराने सगळे बदलले. रेवा आणि निखिलचे जरी एकमेकांवर प्रेम असले तरी कॉलेज बदलल्यामुळे दोघांच्या भेटीगाठी कमी कमी होत गेल्या.

Prema Tuza Ranga Kasa - Nikhil - Marathi Love Story

रेवा थोडी प्रॅक्टिकल स्वभावाची होती तर निखिल हा हळवा होता. त्यामुळे एकदा का स्पर्धा परीक्षा पास केली की मग रेवाच्या घरी तिला मागणी घालायला जायचे असे त्याचे ठरलेले होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित केले. पण एवढे प्रयत्न करूनही पहिलीच स्पर्धा परीक्षा तो फक्त दोन मार्कानी नापास झाला. मग त्याने अजून जास्त मेहनत करून पुढच्या येणाऱ्या परीक्षेची जोरदार तयारी करायचे ठरवले. त्याला लवकरात लवकर कमवायचे होते कारण तो जेवढे लवकर कमवेल तेवढ्या लवकर त्याला रेवाला मागणी घालता येईल असे त्याला वाटत होते. निखिल अभ्यासामध्ये बिझी असतांना ह्या काळात रेवाने नवीन मित्र मैत्रिणी जमवले आणि त्यांच्या मध्ये रमली. निखिलचे जरी रुटीन बदलले असले तरी रेवा च्या रुटीन मध्ये जराही फरक पडला नाही.

रेवाचे तसेही लग्नाचे वय झाल्यामुळे एम. एसी. च्या दुसऱ्या वर्षाला असतांनाच तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी स्थळ पहायला सुरवात केली. निखिलला ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. तो त्याच्या अभ्यासामध्ये अतिशय बिझी होता. रेवाला आलेले निवेशचे स्थळ घरात सगळ्यांनाच पसंत पडले आणि काहीही कारण नसताना उगाच लग्न लांबवण्यापेक्षा लवकरात लवकर एक चांगला मुहूर्त बघून रेवा आणि निवेशचे लग्न करावे असे ठरले. दिसायला निखिलपेक्षा जास्त छान आणि सी. ए. असणारा निवेश बघताच रेवाला पसंत पडला. तशीही ती प्रॅक्टिकल असल्यामुळे तिने विचार केला की तसेही जर निखिल नोकरीला लागला तर कायम निवेश पेक्षा कमीच कमवेल आणि तो कधी स्पर्धा परीक्षा पास होईल आणि कधी तो नोकरीला लागेल त्यापेक्षा निवेशच्या स्थळाला तिने होकार दिला. 

लवकरच एका चांगल्या मुहूर्तावर रेवा आणि निवेशचे लग्न करण्याचे घरच्यांनी ठरवले. निखिलला ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. रेवा मध्यंतरी निखिलला भेटली पण निखिलला खरं सांगण्याचे धाडस तिला झाले नाही. ती ने विचार केला की त्याला कळल्यावर बघता येईल काय करायचे ते. निखिल अभ्यासात बिझी असताना रेवाची लग्नाच्या खरेदीची गडबड सुरु होती. तर रेवाला लवकरात लवकर आपल्याकडे आणता येईल म्हणून निखिलची अभ्यासाची गडबड वाढली. रेवाचे लग्न महिन्यावर असतांना निखिलची परीक्षा संपली आता तो रिझल्ट येईपर्यंत निवांत होता म्हणून आता रेवाबरोबर जास्त वेळ घालवता येईल म्हणून तो खूप आंनदी होता.

तो जस जसा रेवाला भेटण्याचा प्रयत्न करायचा तस तशी रेवा त्याला काही ना काही कारण सांगून टाळते, हे त्याला लवकरच लक्षात आले. त्याने त्यांच्या कॉमन मैत्रिणीकडे चौकशी केली की रेवा का अशी वागतेय, तेंव्हा त्याला खरे कारण कळले. खरे कारण कळताच त्याला खूप मोठा धक्का बसला आणि कदाचित रेवाला लग्नासाठी घरच्यांनी जबरदस्ती केली असावी असे निखिलला वाटले. त्याला असाही विश्वास होता की तो शांतपणे जो काही प्रॉब्लेम असेल तो सोडवेल. तो जरी रेवाला वारंवार भेटत नव्हता तरी ही त्याचे रेवा वर अतिशय प्रेम होते आणि रेवा शिवाय आयष्याची तो कल्पनाच करू शकत नव्हता. त्यामुळे तो त्याच्या घरच्यांना घेऊन रेवाच्या घरी गेला. पण तुमचा मुलगा अजूनही कमवत नाही आणि कधी कमवेल? हे माहीतही नाही त्यामुळे हाती असलेले निवेशचे उत्तम स्थळ का घालवायचे? असा प्रश्न रेवाच्या घरच्यांनी निखिलच्या घरच्यांना केला. तसेही रेवाच्या घरच्यांचे म्हणणे निखिलच्या घरच्यांना पटल्यामुळे ते तसेच घरी आले. त्यांनीही निखिलला हेच सगळे समजावून सांगितले. पण रेवा शिवाय तो आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याचे रेवावरअसलेले प्रेम बघून त्याने रेवाच्या लग्नात काही गोंधळ घालू नये म्हणून त्याच्या आईने त्याला धमकी दिली की त्याने जर रेवाच्या लग्नात गोंधळ घेतला तर ती त्याच्या बरोबर आयुष्यभर बोलणार नाही. निखिलच्या आईला वाटले की थोड्याच दिवसात तो रेवाला विसरून जाईल.

रेवाचे लग्न तर कोणतीही अडचण न येता पार पडले. निवेश आणि रेवाची जोडी तर अतिशय छान आणि एकमेकांना साजेशी होती. लग्नानंतर रेवा आणि निवेश हनिमूनला गोव्याला जाऊन आले आणि त्यानंतर रेवा एकदा माहेरी आली. लग्नाच्या गोंधळात निखिलचा विषय ती पूर्णपणे विसरली होती. रेवाच्या लग्नाला आता साधारण सहा महिने होऊन गेले तिचे सगळे छान चालले होते. निवेशच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली रेवा निखिलला पूर्णपणे विसरली. पण निखिलचे तसे नव्हते. त्याने रेवाला त्याचा भावी जोडीदार म्हणून पहिले होते आणि ती नाही तर कोणीही नाही अशी त्याची भूमिका होती. ह्या सहा महिन्याच्या काळात त्याने तिला विसरण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तरीही तो तिला विसरू शकला नाही.

एका कॉमन मित्राकडून रेवा माहेरी आल्याचे निखिलला कळले. तिच्या घरी तर त्याला जायचे नव्हतेच पण मग तिच्या बिल्डिंग जवळ येऊन त्याने तिला फोन केला. चार रिंग होऊनही फोन उचलावा की नाही ह्या विचारात असलेल्या रेवाने शेवटी निखिलचा पाचवा कॉल उचलला. अगोदरच रेवामुळे डिप्रेशनमध्ये असलेल्या निखिलला आपण काय करतोय ह्याचे भान नव्हते. त्याने अगोदर रेवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिने निवेशला सोडून निखिलकडे यावे आणि ते दोघे परत एकत्र राहतील. पण ही गोष्ट शक्य नाही हे रेवाने सांगितल्यामुळे निखिल चिडला आणि तू जर आताच्या आता मला भेटायला आली नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने रेवाला दिली. रेवाला वाटले तो असे काहीच करणार नाही म्हणून तिने त्याचा फोन कट केला आणि थोड्यावेळ शांत बसावे म्हणून ती घराच्या बाल्कनीत गेली. कारण कितीही प्रॅक्टिकल असली तरीही मनातून ती घाबरलेलीच होतीच.

थोड्याच वेळात बिल्डिंगच्या जवळ एवढी माणसे का गोळा झाली आणि हा कसला गोधळ चाललाय म्हणून ती ने वाकून बघितले. तर निखिल तिला आगीच्या विळख्यात दिसला. त्याच्या जवळ असलेल्या लोकांनी खूप प्रयत्न केले त्याला वाचवायचे पण दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

वेळीच जर रेवा निखिल बरोबर बोलली असती त्याला समजावले असते तर आता परिस्थिती वेगळी असती. निखिल ने स्वतःचा जीव देऊन त्याचे रेवा वर असलेले प्रेम सिद्ध केले. पण ह्या सगळ्यांमध्ये रेवाला त्याने आयष्य भराचे दुःख तर दिलेच, पण निवेश चा काहीही संबंध नसताना त्याला ही शिक्षा मिळाली. हे करून निखिलला काय मिळाले हे त्याचे त्यालाच माहिती पण त्यामुळे प्रेमाचा रंग असाही असू शकतो हे नव्याने कळले.. 

(Marathi Love Story)