Rama - Marathi Story
17 January 2024

रमा (Marathi Story)

By shadesoflife.in

(This Marathi story is inspired by true events.)

एका साधारण कुटुंबात जन्मलेली रमा, कधी रशीदच्या प्रेमात पडली हे तिला कळलेही नाही. वडील नसलेली रमा, तिची मोठी बहीण राधा, लहान भाऊ रोहन आणि आई हे एकत्र एका चाळीत राहत होते. उत्साहाचा जिवंत झरा असलेली रमा गावात सर्वांची लाडकी होती. ती कधी लव्ह मॅरेज करेल असे कोणालाही वाटले नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कॉलेज करता करता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ती एका ऑफिसमध्ये जॉब पण करत होती. कधीतरी एकदा गावाचा उरूस असताना तिने पहिल्यांदा रशीदला बघितले आणि ती त्याच्या प्रेमातच पडली. रशिदचेही काही प्रमाणात तसेच झाले.

Rama - Marathi Story

एका विशिष्ट प्रमाणात विषारी द्रव्य घेऊनही काहीही होत नाही म्हणून फेमस असलेला रशीद त्याच्या ह्याच कलेवर खूप पैसे कमवत होता. रमा आणि रशिदच्या भेटीगाठी वाढत गेल्या तशी त्यांना जाणीव झाली की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाल्यावर त्या दोघांनीही कोणाचाही विचार न करता पळून जाऊन लग्न केले. गाव छोटेसे असल्यामुळे लवकरच बातमी गावात पसरली. सगळ्यांना ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला की रमाने मोठी बहीण लग्नाची असताना कसे काय लग्न केले. तिच्या घरचे तिच्या ह्या निर्णयावर खूपच नाराज झाले आणि त्यांनी तिच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडले. राशिदचे रमावर अतिशय प्रेम होते आणि म्हणूनच रशीदने प्रेमाने तिचे नाव रशिदा ठेवले. लवकरच रमा रशिदा म्हणून ओळखली जाऊ लागली.

Rama and Rashid - Marathi Story

गावाकडेच वाढलेल्या रशीदच्या घरात जरा जुन्या विचारांचे वातावरण असल्यामुळे रमाला खूपच बंधने टाकली गेली. आपल्या कुटुंबामध्ये जॉब करत नाही असे कारण सांगून लग्नानंतर तिला जॉब पण सोडायला लावला. नवीन लग्न असल्यामुळे आणि रशीदवरच्या प्रेमामुळे रमा राशिदच्या घरचे जसे म्हणतील तसे करत होती. जी मुलगी सगळ्या गावात बिनधास्त फिरायची ती आता बुरख्यात फिरायला लागली.

Rama - Marathi Story

लग्नाच्या एकाच वर्षात रमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिच्या माहेरच्यांचा रुसवा थोडा कमी झाला. आता रमा कधीतरी माहेरीही जाऊ लागली. रशीद आणि रमाची मुलगी खुशबू हळूहळू मोठी होऊ लागली आणि रमा तिच्या बाळलीलात रमली. आपल्या घरचे रमाला उगाचच त्रास देतात हे लक्षात येताच रशीद रमासह वेगळ्या घरात रहायला गेला. थोडक्यात सगळेच छान चालले होते. मधल्या काळात तिच्या मोठ्या बहिणेचे म्हणजेच राधाचे लग्न झाले, जे करताना तिच्या घरच्यांना खूप अडचणी आल्या, त्याला कारण म्हणजे रमाचे लग्न होते.

गावात दर तीन वर्षांनी येणारा उरूस ह्यावर्षी परत आला. नेहमीप्रमाणे रशीदने काही प्रमाणात विषारी द्रव्य प्राशन केले. नेहमी द्रव्य पिऊन शांत बसणारा रशीद त्यादिवशी मित्रांच्या आग्रहामुळे नाचायला गेला. उत्साहाच्या भरात खूप नाचल्यामुळे ते विषारी द्रव्य त्याच्या पूर्ण शरीरात पसरले आणि थोड्या वेळापूर्वी उत्साहात असणारा रशीद आता निपचित पडला होता. थोड्याच वेळात होत्याचे नव्हते झाले.

अगोदरच नावडत्या असलेल्या रमाला रशीदच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातून आणि पर्यायाने त्याच्या इस्टेटी मधून बेदखल करण्यात आले आणि तिची रवानगी तिच्या माहेरी झाली. आता रशिदाची परत रमा झाली, पण ह्या सगळ्या घडून गेलेल्या घटनेमुळे तिचा स्वभाव पूर्ण बदलला. अगोदरची उत्साही आणि बडबडी असलेली रमा आता शांत रहायला लागली. कोणी ओळखीचे रस्त्यावरून जाताना अगोदरची रमा स्वतःहून थांबून खूप गप्पा करायची आणि आता तिला थांबवायला लागायचे.

जीवनात घडून गेलेल्या घटनेमुळे तसेही मानसिकरीत्या ती पूर्ण खचली होती. ती जर कामात अडकली तर तिला राशिदची जास्त आठवण येणार नाही आणि घरखर्चालाही हातभार लागेल म्हणून तिच्या घरच्यांनी तिला परत नोकरी करण्यासाठी तयार केले. ह्या तीन वर्षात तिच्या जीवनात घडून गेलेल्या घटनेमुळे तसेही मानसिकरीत्या ती पूर्ण खचली होती. ती जर कामात अडकली तर तिला राशिदची जास्त आठवण येणार नाही आणि घरखर्चालाही हातभार लागेल म्हणून तिच्या घरच्यांनी तिला परत नोकरी करण्यासाठी तयार केले.

Rama working in office - Marathi Story

तिच्या जीवनात घडलेल्या घडामोडींमुळे आणि लोकांच्या नजरेत असलेल्या वेगवेगळ्या आणि विचित्र प्रश्नांमुळे रमाने त्याच गावात राहून नोकरी करणार नाही असे घरी स्पष्ट सांगितले. नवीन गावात नवीन नोकरी बघितली तर रशीदची आठवण येणार नाही आणि वातावरण बदलले तर रमा जुने सगळे विसरेल म्हणून तिच्या घरच्यांनी तिला बाहेरगावी नोकरी करण्याची परवानगी दिली.. ती लवकरच दुसऱ्या गावात तिच्या मुलासह शिफ्ट झाली. अगोदर करत असलेल्या चांगल्या कामामुळे आणि ओळखीमुळे तिला परत एका ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम मिळाले आणि जर सहा महिने चांगले काम केले तर मग तिला नोकरीत कायम करणार असेही सांगण्यात आले. गाव आणि जुन्या आठवणी सोडल्यामुळे तिला इथे आता सगळे चांगलेच होणार असा विश्वास बसायला लागला. जवळचे काही चांगले मित्र मैत्रिणी, आई, बहीण आणि भावामुळे रमा हळूहळू नॉर्मल होऊ लागली.

कामानिमित्त ऑफिसमध्ये येणारा रोशन एका मुलाची आई असलेल्या रमाच्या प्रेमात पडला. रंगाने जरी सावळी असली तरी रमाचा चेहरा खूप रेखीव होता. रोशनने जेंव्हा तिच्याबद्दल माहिती  गोळा केली तेंव्हा तर काही दिवस तो खूप उदास होता. तिने हे सगळे कसे सहन केले असेल, हा विचार मनात आल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहायचे नाही. तिला इतके प्रेम द्यायचे की ती पूर्वीसारखी होईल, ह्यासाठी आता रोशनचा संघर्ष सुरु झाला. पण ह्या अगोदर तिला आपल्या मनात काय आहे हे कळले पाहिजे ही जाणीव रोशनला झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली. तिच्या सहवासात जास्तीत जास्त कसे राहता येईल हा विचार कायम त्याच्या मनात असायचा. त्याने तिच्या मुलीशीही मैत्री केली आणि लवकरच तिचा लाडका रोशन अंकल झाला. त्याचा बिझनेस अगोदरच छान चालत असल्यामुळे त्याला कमवायचे विशेष असे टेन्शन नव्हते. हळू हळू त्याच्या सहवासात राहून रमाला त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या. त्याचे हळुवार वागणे, मुलाशी प्रेमाने वागणे, कोणतीही अडचण असेल तर पटकन मदतीला धावणे हा रोशनचा स्वभाव, तिला त्याच्या अजून जवळ घेऊन गेले.

Rama and Roshan - Marathi Story

घरच्यांच्या, मैत्रिणींच्या आणि रोशनच्या साथीने हळूहळू रमा तिच्या मूळ रूपात परत येऊ लागली. कधीतरी एकदा कातरवेळी रोशनने तिच्यावरचे प्रेम कबूल केले आणि तेवढ्याच आनंदाने रमाने ते स्वीकारले. एक चांगला असा मुहूर्त बघून पंजाबी पद्धतीने रमा आणि रोशन लवकरच विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नात त्यांची मुलगी खुशबू ही भाव खाऊन गेली कारण तिचा लाडका रोशन अंकल आता तिचा लाडका डॅडी होणार होता. लग्नाच्या दोन वर्षानंतर रमा परत एकदा एका मुलीची आई झाली. आता त्यांचे चौकोनी कुटुंब अगदी हेवा वाटावा असे झाले.

एवढ्या वर्षांत रमाच्या जीवनात जी संकटे आली त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात सुख तिच्या पदरात पडले. आता तिच्या दुसऱ्या लग्नालाही जवळपास दहा वर्षाच्यावर काळ लोटला. सगळे अतिशय उत्तम चाललेय आणि असेच चालू राहू दे. रशीदने रमावर जीवापाड प्रेम केले पण त्याची साथ तिला जास्त लाभली नाही. त्या प्रेमाचा रोशनने आदर ठेऊन रमाच्या मनामध्ये असलेल्या रशीदसह रमाला मोठ्या मनाने स्वीकारले. ह्या सगळ्या प्रवासात रोशनला त्याच्या परिवाराची उत्तम साथ मिळाली आणि जगात प्रेम असेही असते ह्यावर पुन्हा एकदा विश्वास बसला. 

Rama and Roshan happy family - Marathi Story

(Marathi Story)