(This Marathi story is inspired by true events.)
आजची आपल्या कथेची नायिका आहे कोकणात राहणारी सधन घरातील अंजली. ती जरी कथेची नायिका असली तरी ती इतर कथेच्या नायिके सारखी सुंदर नाहीये तर ती प्रत्यक्ष जीवनात सुंदर आहे. अंजली दिसायला नाकी डोळी नीट, सावळी आणि थोडीशी हेल्दी, वागायला तशी ती एकदम बिनधास्त आणि अभ्यासात सर्वसाधारण होती.अंजली जरी हेल्दी असली तरी ती खूपच ऍक्टिव्ह होती. सतत काही न काही करणे, लोकांना मदत करणे तिला आवडायचे. त्याच गावात असणाऱ्या एकमेव कॉलेज मधून तिने बी ए पास केले. तसेही तिला पुढे शिकण्यात फार इंटरेस्ट नव्हता म्हणून ती कधीतरी त्यांच्या दुकानातही बसायची आणि तसे त्यांचे गाव पण लहान असल्यामुळे तशी ती गावात सगळ्यांना बऱ्यापैकी माहित होती.
कायम दुकानात दिसणारी अंजली मध्यंतरी खूप दिवस दुकानात दिसली नाही त्यामुळे त्यांच्या दुकानात येणारे जाणारे तिच्याविषयी तिच्या घरच्यांना विचारायचे पण ती तिच्या मामाकडे गेली हे उत्तर मिळायचे. त्यानंतर थोड्याच दिवसात अंजलीने पळून जाऊन लग्न केले अशी बातमी गावात पसरली. सगळ्यांना उत्सुकता होती की अंजली ने कोणाबरोबर लग्न केले, तर त्याच गावातील मंगेश बरोबर लग्न केले ही बातमीही लगेचच गावात पसरली. मंगेश दिसायला छान कॅटरगारीत मोडणारा. दिसायला बऱ्यापैकी गोरा, मध्यम बांध्याचा आणि उंच ही होता पण त्याचे शिक्षण विशेष नव्हते. तो ही त्याच गावातूनच बारावी पर्यंत शिकलेला होता.
गावात सगळ्यांना हाच प्रश्न पडला की ही जोडी अशी कशी काय. तसेही गावात ते कधीच एकत्र फिरतांना किंवा बोलतानाही कोणाला दिसले नाहीत. मंगेश हा गावात कोणाकडे तरी कामाला होता आणि त्याच्या घरची परिस्थिती म्हणजे दोन वेळ खाऊन पिऊन सुखी. मंगेश नि लग्न करून डायरेक्ट अंजलीला घरात आणल्यामुळे त्याच्या घरातून कोणीही त्याला काहीच बोलले नाही कारण त्याच्या मोठ्या भावाने ही प्रेम विवाह केला होता. पण ही जोडी तशी दिसायलाही थोडी विचित्र असल्यामुळे गावात सगळ्यांना वाटले की त्यांच्या घरात वाद होतील पण तसे काहीच झाले नाही. मंगेशच्या घरच्यांनी त्यांना अगदी मोठ्या मनाने घरात घेतले आणि सुरु झाला अंजली आणि मंगेशचा संसार.
सुरवातीला सगळे छानच चालले होते. नव्याचे नऊ दिवस संपले आणि लवकरच अंजलीला लक्षात आले की मंगेश कामाला कोणत्याही ठिकाणी फार वेळ टिकत नाही. कामाच्या बाबतीत त्याची धर सोड वृत्ती आहे. लग्नाचे सुरवातीचे दिवस असल्यामुळे ती त्याला काहीच बोलत नव्हती. जे मिळत होते त्यातच ती समाधान मानत होती. तसेही एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांना विशेष असा पैशांचा ताण पडत नव्हता. काहीच दिवसात त्यांना घरातून वेगळे काढण्यात आली त्याला कारण म्हणजे मंगेश जास्त काही कमवत नव्हता. घरच्याना वाटले की त्याला वेगळे काढले तर तो जबाबदारीने काम करेल.
लग्नाच्या सुरवातीच्या पाच वर्षातच अंजली दोन मुलींची आई झाली. घरात खाणारी लोक वाढल्यामुळे घर खर्चही वाढत गेला आणि मंगेशच्या कामाच्या धर सोड वृत्ती मुळे अंजलीने शेवटी काम करण्याचा निर्णय घेतला. तशीही ती दुकान छान सांभाळायची त्यामुळे तिने तिच्या घरच्यांची मदत घेऊन छोटेसे मासे विकायचे दुकान काढले. ती दिवसभर दुकान सांभाळून मुलींचेही छान करायची. मंगेशला आता कमवायचे टेन्शन राहिले नाही त्यामुळे आणि तो तसाही कमवण्याच्या बाबतीत निवांत असल्यामुळे तो अजून निवांत झाला.
अंजली सगळे छान सांभाळते म्हंटल्यावर मंगेशचे कमवायचे टेन्शन तर मिटलेच. अगोदर घरची जबाबदारी असल्यामुळे काहीतरी काम करणारा मंगेश आता एकदम रिलॅक्स झाला. त्याच्याकडे आता रिकामा वेळ भरपूर असल्यामुळे त्याने त्याच्यासारखे काही मित्र जमवले. रिकामे फिरणारे, दारू पिणारे. अश्या मित्रांच्या संगतीत राहून मंगेशला पण दारू प्यायची सवय लागली. अंजली सुरवातीला त्याच्याशी खूप भांडली पण तो तिचे काही ऐकत नाही म्हंटल्यावर तिने त्याला सांगणे पण सोडून दिले.
आता तर तिच्यावरची जबाबदरी जरा जास्तच वाढली. तिने मंगेशवर मनापासून प्रेम केले होते म्हणून ती त्याला सहन करत होती. तो एक कमवत नव्हता पण त्यानेही अंजलीला कधी कोणत्या गोष्टीत अडवणूक केली नाही. तिच्या घरचे तसेही तिच्या लग्नाच्या बाबतीत तिच्यावर नाराज होते आणि त्यात मंगेशच्या वागण्यामुळे त्यात भर पडली. त्यांनी अंजलीला सांगितले की तुला आणि मुलींना आम्ही सांभाळतो तू मंगेशला सोडून दे पण अंजलीने ह्या गोष्टीला ठाम नकार दिला. घर, दुकान आणि मुलींची शाळा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता ती जरा सोशिअल पण झाली, तिच्यातला आत्मविश्वास पण वाढला. तसेही ती बोलायला जशी बिनधास्त होती तशी ती कोणालाही मदत करण्याला पुढे मागे पाहणारी नव्हती. दुकानामुळे हळूहळू तिच्या ओळखीही वाढायला लागल्या होत्या. आधी तिच्या दिसण्यावरून, रंगावरून आणि तब्बेतीवरून तिला बोलणारे लोक आता तिचे जबाबदारीने वागणे, सगळ्यांना मदत करणे, सासरचे आणि माहेरचे सगळे नातेवाईक छान सांभाळणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिचे खूप कौतुक करायला लागले.
मध्ये काही काळ लोटल्यानंतर निवडणूक आल्या आणि त्यांच्या वार्ड मधून तिने निवडूणुकीला उभे रहावे असे सगळ्यांना वाटायला लागले. तिच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी आणि तिच्या मोठ्या झालेल्या मुलींनी तसेच मंगेश ने केलेल्या आग्रहामुळे ती निवडणुकीला उभी राहिली आणि प्रचंड मत मिळवून ती त्यांच्या वार्ड मधून नगरसेविका म्हणून निवडून आली. आता लोकांची सेवा करणे आणि आपले कुटुंब छान सांभाळने ह्यात ती छान बिझी झाली. गावातल्या लोकांनाही तिचे खूप कौतुक आहेच. काहीही काम न करणारा नवरा असूनही तिने शून्यातुन विश्व उभे केले. असे असूनही तिचे त्याच्यावरचे प्रेम जराही कमी झाले नाही कारण तिने तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार केला. जे आहे आणि जसे आहे ते तिने तसे स्वीकारले, मुलींना छान घडवले, तिचे एवढे करणे बघून मंगेशला जाणीव झाली त्याच्या चुकीची आणि त्यानेही दारू पिणे सोडले आणि अंजलीच्या समाजसेवेच्या कामात तिला मदत करायला लागला एवढे सगळे घडले अंजलीच्या आयुष्यात त्यात अर्थात तिला माहेर आणि सासरचा पाठिंबा होताच.
This Marathi story is inspired by true events.